ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करणाऱ्या एक चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम असे त्याचे नाव आहे. हा अट्टल दरोडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे. या चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी गजाआड केले. या चोराने २२ घरफोड्यांमधून एकूण ६२ लाख रुपयांचे ८९ तोळे सोने चोरले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहे.
मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणार आहे. गुवाहाटीहून तो मुंबईला विमानाने यायचा. घरफोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच जायचा. नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तो आसामला परतला. पण पोलिस त्याच्या मागावर होते. त्याचा तपास करणे पोलिसांना अत्यंत कठीण गेले. तो मोबाईल स्विच ऑफ करून फिरत होता.
पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी थेट गुवाहाटी गाठली. पोलिसांना पाहताच त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्यात तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावर ट्रान्सफर वॉरंट मिळाले.