नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जगभरात होमिओपॅथी उपचार प्रणालीची परिणामकारकता तसेच स्वीकृती वाढवण्यासाठी जागतिक सहयोगाच्या आवाहनासह आज नवी दिल्ली येथे होमिओपॅथी परिषदेचा समारोप झाला.या दोन दिवसीय परिषदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच होमिओपॅथी आणि आयुष क्षेत्रातील सात पद्म पुरस्कार विजेते सहभागी झाले होते. या होमिओपॅथी परिषदेमध्ये 6,000 हून अधिक प्रतिनिधी, डॉक्टर्स, संशोधक, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी तसेच शिक्षकवृंदाने एका छताखाली उपस्थित राहून होमिओपॅथीविषयक अर्थपूर्ण चर्चेत भाग घेतला.
या परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या विविध सत्रांदरम्यान, सुप्रसिद्ध होमिओपॅथिक चिकित्सकांनी या प्रणालीचा उपयोग करुन गुंतागुंतीच्या आजारांचे व्यवस्थापन करण्याविषयीचे त्यांचे अनुभव सामायिक केले. यावेळी, अनुवादात्मक संशोधन, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, होमिओपॅथीमधील जागतिक दृष्टीकोन,होमिओपॅथिक औषधांच्या दर्जाची हमी तसेच आंतरशाखीय संशोधन यांसारख्या विविध विषयांवर गटचर्चा आयोजित करण्यात आल्या. या चर्चांमधून या विषयातील तज्ञ, संशोधक, उद्योगांचे प्रतिनिधी, व्यावसायिक संघटना आणि इतर भागधारकांनी केलेल्या फलदायी चर्चेतून त्यांचे अनुभव तसेच त्यांच्यासमोरील आव्हाने आणि या आव्हानांवर मात करण्यासाठीचे प्रयत्न याविषयी माहिती देण्यात आली. या चर्चेतून या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी धोरणात्मक दृष्टीकोनांविषयी रचनात्मक शिफारसी सुचवण्यात आल्या.
या परिषदेला उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ञांनी होमिओपॅथिक संशोधन तसेच या उपचारप्रणालीच्या अंमलबजावणीदरम्यान आलेले अनुभव उपस्थितांशी सामायिक केले. समारोप सत्रात मान्यवरांनी होमिओपॅथीचा वापर करून उपचार करणाऱ्या समुदायामध्ये ऐक्य असल्याची ग्वाही दिली आणि या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये करणे आवश्यक असलेल्या कृती यांची माहिती सामायिक केली.
होमिओपॅथीच्या क्षेत्रात अधिक प्रगती करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारोप सत्राने या परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात होमिओपॅथी उपचार प्रणालीची परिणामकारकता तसेच स्वीकृती वाढवण्यासाठी निरंतर संशोधन, दर्जेदार शिक्षण तसेच जागतिक सहयोगाचे महत्त्व या परिषदेने अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी सांगतेने या क्षेत्रातील घडामोडी अधिक ठळकपणे मांडल्याच त्याचसोबत आरोग्यसेवा क्षेत्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या भविष्यातील उपक्रमांसाठीचा मार्ग प्रशस्त केला. सुप्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाचा समावेश असलेल्या सांस्कृतिक संध्येसह ही परिषद संपन्न झाली.