वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्धा लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर तसेच त्यांच्या मुलावर अनेक गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. तडसे यांची सून पूजा यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रामदास तडस, त्यांचा मुलगा पंकज तडस व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे २० एप्रिलला सभा आहेत. त्यांनी माझ्या मुलाला व मला न्याय द्यावा. मला भेटण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
लोखंडी रॅाडने मारहाण केल्याची तक्रार
सून पूजा यांनी मला लोखंडी रॅाडने मारहाण करण्यात आली. मला बाळ झाले, त्या वेळी तडस कुटुंबीयांनी त्याचा बाप कोण? असा सवाल करून डीएनए टेस्टची मागणी केली. नवरा पंकज यांनी माझा केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला. मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवले. नंतर घराबाहेर काढले, असे त्यांनी सांगितले.
मी डीएनए टेस्ट करायला तयार
हे बाळ माझ्या मुलाचे नाही, डीएनए टेस्ट करा असे खा. तडस म्हणतात. घरातील सुनेला ते ठेवलेली बाई म्हणतात. माझा अपमान करतात. केवळ लोकांसमोर माझी बाजू मांडता यावी, म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचविण्यासाठी त्यांनी लग्न लावून दिले, असा आरोप त्यांनी केला. मी डीएनए टेस्ट करायला तयार आहे. पण सर्व गोष्टी कोर्टाद्वारे व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपाचे केले खंडण
निवडणुका आल्या की असे गंभीर आरोप होतात असे सांगत खा. रामदास तडस यांनी आरोपाचे खंडण केले. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तिने आणि तिच्या नवऱ्याने त्यांचे त्यांचे बघावे. त्यांच्या लग्नाबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पंकज यांनी पूजा व अन्य लोकांवर हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा आरोप केला.