इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोलीः बेईमानी करायची. पक्ष फोडायचे. पाप करायचे. त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे धंदे सोडा. बिनबुडाचे आरोप करणे सोडा. गडचिरोली आम्ही जिंकत आहोत. सर्व सूत्रे मी हातात घेतली आहेत. त्यांना पराभव समोर दिसत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हे नावाला राजे आहेत. भाजपसमोर झुकलेले, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मराबाबा अत्राम यांच्यावर टीका केली.
अत्राम यांनी आज सकाळी सकाळी मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्या भाजपसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्या चर्चांचा मी साक्षीदार आहे. मी आदिवासी माणूस आहे. खोटे बोलत नाही. वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये येणार असल्याचे अत्राम यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तल्यानंतर वडेट्टीवार चांगलेच संतापले आहे. ते म्हणाले, की धर्मरावबाबा यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप गडचिरोलीत पराभूत झाला, तर मंत्रिपद जाईल ही भीती त्यांना आहे. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करतात.
गडचिरोली मतदारसंघ काँग्रेसमय झाला आहे. या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत असल्याने मंत्रिपद जाईल याची भीती धर्मरावबाबांना आहे. म्हणूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना ही बुद्धी कुठून सूचली? गडचिरोलीत मी तळ ठोकून आहे, म्हणूनच मला त्रास देण्यासाठी हा आरोप केला जात आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. या मतदारसंघात भाजपला मताधिक्य देऊन दाखवाच, असे आव्हान अत्राम यांना दिले. धर्मरावबाबांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्यांनी केली. तुम्हाला महायुतीत कोणी कुत्रे विचारत नाही. उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाही. तुमची गोची केली. महायुतीत जाऊन तुम्ही गुलामासारखे जगता, अशी टीका त्यांनी केली.
धर्मरावबाबा आत्रम यांच्यासारखे इतरांनी भाजपसमोर झुकावे अशी यांची इच्छा असेल; पण आम्ही स्वाभिमानी आहोत. काँग्रेसला जिंकून देऊ. गडचिरोलीमध्ये काँग्रेस राजा आहे आणि यांची जागा यांना दिसेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.