मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ई बिक्स कॅश इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक आगारात बसेस जागेवरच उभ्या असल्याचे व राज्यातील एसटीची सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. एसटीच्या राज्यभरातील २५० आगारामध्ये ई-बीक्स कॅश या नव्या संस्थेमार्फत ‘इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणाली ‘ नव्याने बसविण्यात येत आहे.
ही प्रणाली अत्यंत अत्याधुनिक आणि कार्यक्षम असून प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तसेच आरक्षण करण्यासाठी या प्रणालीचा चांगला वापर होत आहे. तथापि, दिनांक १७.१०.२०२३ रोजी सकाळी ७:३० ते ९:४५ दरम्यान ही प्रणाली काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यात दुरुस्ती करून सकाळी ९:४५ वाजता ही प्रणाली पूर्वरत सुरू झाली आहे. या काळात आगारातून वाहकांना जुन्या पध्दतीची मॅन्युअल तिकीट ट्रे देऊन बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही अथवा बस फेऱ्या रदद झाल्या नाहीत, असे स्पष्टीकरणही एस टी महामंडळाने दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.
तरी, सदर ई-बीक्स कॅश इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिन प्रणाली व्यवस्थित काम करीत असल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट प्रणाली सुरळीत सुरू आहे, असे एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी खुलासाद्वारे कळविले आहे.