इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत दिली. त्यांचा प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते म्हणाले. पण, यावेळी त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवून ते पक्षात येत नसल्याचे सांगितले.
आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी वेट अँण्ड वॅाच अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मोहित पाटील पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले. महाविकास आघीडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या असून त्यापैकी ९ उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले. पण, माढा लोकसभा मतदार संघातील नाव जाहीर करण्यात आले नाही. आता मोहित पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांचे नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार आहेत. मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परतणे हा पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो. या प्रवेश सोहळ्यात मात्र धैर्यशील यांचे बंधू, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मात्र उपस्थितीत राहणार नाही.
भाजपने माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबाचा विरोध असल्यामुळे हा प्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.