इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला. सत्यजित आबा यांच्यासारखे सालस, निष्ठावंत, प्रामाणिक नेतृत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभले आहेत. सर्व गणितं लक्षात घेता शिराळा विधानसभा मतदारसंघातून आपण लीड मिळवू शकू हा माझा विश्वास असल्याचे जयंता पाटील यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, आदरणीय बाबासाहेब पाटील सरूडकर साहेबांना मी गेल्या ४० वर्षांपासून पाहत आलो आहे. सहकार क्षेत्र असो की विधिमंडळ त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली. नम्रता हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सत्यजित आबा यांनी लोकांशी नाळ जोडली. लोकांचा खासदार म्हणून सत्यजित आबा आपल्या सर्वांना योग्य न्याय देतील.
राज्यातील वीज क्षेत्र बुडण्याच्या मार्गावर आहे. धनिकांच्या वीज कंपन्या चढ्या भावाने महाराष्ट्रात वीज विकत आहेत. त्यामुळे विजेचे दर प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जातो आहे.देशातील महागाई, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार, दडपशाही शिगेला पोहोचली आहे. हे केंद्राचे प्रशासकीय अपयश आहे. आघाडीद्वारे काँग्रेस पक्षाने घोषित केलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक आहे. अंगणवाडी सेविकांना दुप्पट पगार, पदवीधर तरुणांना नोकरी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वतंत्र आयोग, आरक्षणासाठी विशेष तरतूद अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची तरतूद नमूद केली आहे.
पक्ष फुटलेला असला तरी माणसं फुटलेली नाहीत हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या दिवसात गावागावात सर्व पक्षांनी मिळून प्रचाराचा नियोजन करा. जबाबदाऱ्या वाटून घ्या. आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकजुटीने कार्य करायचे आहे असेही त्यांनी सांगितले.