नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जेलरोड येथील मोरे मळा भागात पूर्ववैमनस्यातून घरात घुसून टोळक्याने महिलेस शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेत चार जणांच्या टोळक्याने दरवाजा व खिडकीवर दगडफेक करीत महिलेच्या घरात घुसून गृहउपयोगी वस्तूचे नुकसान केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील बोराडे (रा.पिंपळपट्टीरोड बोराडेमळा) व त्याचे चार साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत कल्याणा संतोष मोरे (रा.महालक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे मंगळवारी (दि.९) रात्री घरात एकट्या असतांना ही घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढत टोळक्याने महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून हे कृत्य केले.
महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत संतप्त टोळक्याने दरवाजा व खिडकीवर दगड मारून तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू फेकून देत नुकसान केले. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.