इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः अहमदनगर जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे सहसार क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी हा निकाल दिला आहे.
त्याचप्रमाणे कर्ज न भरणाऱ्या १२ संचालक अन् कर्जदारांना तीन ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अपहार प्रकरणी २०११ मध्ये कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी १७ आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत १९ हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.
१३ कोटी ३८ लाखांचा गैरव्यवहार
जिल्हा न्यायालयाने कर्ज न भरणाऱ्यांवर कारवाई केली. १२ संचालक आणि कर्जदारांना तीन ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांनी संपदा पतसंस्थेत १३ कोटी ३८ लाखांचा गैरव्यवहार केला.
यांना झाली जन्मठेपेची शिक्षा
जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमद्ये संस्थापक अध्यक्ष आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे यांचा समावेश आहे.