नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –नाशिकच्या, गंगापूर रोड भागातील डीके नगर येथे नविन घराचे बांधकाम सुरु होते, यात खड्ड्यात उतरून भिंत बांधत असतांना एकाबाजूची भिंत कोसळून या भिंतीच्या ढिगार खाली चार मजूर दबले गेले. यात, गोकूळ संपत पोटींदे, प्रभाकर काळू बोरसे यांचा जागेवर मृत्यू झाला तर संतोष तुकाराम दरोगे आणि अनिल रामदास जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर प्रकरणी आपण आयुक्तालया तर्फे मृत कामगारांच्या आप्तांच्या मागणी नुसार चौकशी करून मयत व जखमी कामगारांना न्याय मिळवून द्यावा व योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी कामगार उपायुक्तांकडे महाराष्ट्र आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केली आहे.
त्यांनी ही मागणी करतांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर प्रकरणी पोलीसां कडून फक्त ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या बांधकाम जागेचे मालक हे प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असून त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आपण यात योग्य ती कारवाई होईल अशा प्रकारे तजवीज करावी.
तसेच १७ व्या लोकसभेच्या निवडणूक आचासंहितेच्या कारणास्तव नविन कामगार नोंदणी तसेच नूतनीकरण ऑनलाइन नोंदणी बंद ठेवल्यामुळे कामगार वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक मार्फत अशी मागणी करतो की ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याविषयी मंडळाला कळवावे तसेच मयत व जखमी कामगारांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्वरित आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर कॉम्रेड भिमा पाटील , नाशिक जिल्हा सचिव ,महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना मिलिंद धबडगे, रमाबाई टाकणसार, मनिर अन्सारी, हिरामण घुलूम,नाना कडाळे, मुकेश कडाळे आदी बांधकाम कामगार संघटनेच्या सह्या आहे.