मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसने धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री डॅा. शोभा बच्छाव उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे. भाजपने या मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री डॅा. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. दोन डॅाक्टरांमधील ही लढाई असली तरी त्यात काँग्रेसचा उमेदवार नाशिक जिल्हयातील तर भाजपचा उमेदवार हा धुळे जिल्ह्यातील असल्यामुळे प्रादेशिक वादही या निवडणुकीत दिसणार आहे.
या लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलाण विधानसभा मतदार संघ आहे. तर धुळे जिल्हयातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या मतदार संघाचा समावेश आहे. लोकसभेची पुर्नरचना झाल्यानंतर २००९ मध्ये या मतदार संघातून प्रतापदादा सोनवणे तर २०१४ व २०१९ मध्ये डॅा. सुभाष भामरे हे निवडून गेले आहे. आतापर्यंत तीन्ही निवडणूकीत भाजपने वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी निवडून येणे इतके सोपे नाही. पण, प्रयत्न केल्यास अवघडही नाही.
या मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा होती. त्याला पूर्ण विराम देत काँग्रेसने ही उमेदवारी जाहीर करुन डॅा. शोभा बच्छाव यांना संधी दिली आहे. बच्छाव यांचे माहेर हे बागलाणमध्ये तर सासर मालेगावमध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांनी धुळे येथे पालकमंत्री म्हणून काम बघितले आहे. त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. मालेगावमध्ये मु्स्लिम मतदार संघाची संख्या मोठी आहे. त्याचाही फायदा डॅा. बच्छाव यांना मिळू शकतो.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीत आनंद
डॅा. बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे नाशिकमध्ये सुध्दा आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नाशिक लोकसभा मतदार संघ ठाकरे यांच्याकडे, दिंडोरी राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे तर मालेगाव – धुळे लोकसभा काँग्रेसकडे गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षांना समसमान संधी मिळाली आहे.