इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ” अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळेच ते पंतप्रधान मोदीजींवर टीका करत आहेत. मात्र पंतप्रधान मोदीजी या टिकेकडे कायम दुर्लक्ष करतात. जर त्यांनी लक्ष दिले तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपा उमेदवार नितीन गडकरी तसेच महायुतीच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा बुधवारी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वसामान्य, गरीब, शोषित, वंचित आणि आदिवासी जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवले असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय नागरिक आता मतदानाच्या दिवसाची वाट पहात असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महायुतीचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे, खासदार अशोक चव्हाण, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार विकास महात्मे, खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, मनीषा कायंदे, आशिष देशमुख, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाइं महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.