नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील महालक्ष्मी चाळ येथील पुतळ्यापासून महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतीराव फुले यांची ११ एप्रिल रोजी जयंती आकर्षक सजावटीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार उत्सव समितीने केला असल्याने यानिमित्ताने गणेश वाडी येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य मंडप उभारला आहे. गुरुवारी चित्ररथ व भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून 20 x 60 च्या भव्य स्क्रीन वर क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेनी केलेल्या संघर्षाची माहिती व त्यांचा जीवनपट दाखविला जात आहे. ११ एप्रिल ला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गणेश वाडी येथील मनपा क्र ३० येथील पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता लक्ष्मीचाळ येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात मंडळाचा सहभाग असणार असून प्रत्येक मंडळाचा विविध देखाव्याचा साधारणपणे २० चित्ररथ यावेळी असणार आहे. उत्सव समितीच्या वतीने या भव्य मिरवणुकीत महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या देखाव्याची बग्गी असणार असून पारंपारिक भव्य ढोल पथक, बँड पथकासह पालखी काढण्यात येणार आहे. यासह वारकरी संप्रदाय, आदिवासी नृत्यपथक, वासुदेव वेशभूषा असे विविध देखावे असणार आहे. यामुळे नाशिककरांनी आपल्या परिवारासह या भव्य मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्यकारी अध्यक्ष शशी हिरवे, महिला अध्यक्ष तेजश्री काठे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक व सह कार्याध्यक्ष दिपक मौले यांनी केले आहे.