नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने स्मार्ट PHC हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सुविधा त्याचबरोबर भौतिक सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सर्व स्मार्ट PHC मधील वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित आढावा बैठक घेतली.
स्मार्ट PHC उपक्रमामध्ये निवड झालेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिशादर्शक फलक हे लावण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक असावे त्याच बरोबर रुग्ण कल्याण समितीच्या बैठका या नियमित घेण्यात याव्या, आरोग्य विभागाच्या इ सुश्रुत प्रणालीचा वापर हा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात करून स्कॅन अँड शेअर या पद्धतीने आरोग्य समस्यांविषयी रुग्णांना समुपदेशन उपलब्ध करून द्यावे अशा सूचना यावेळी केल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्मार्ट PHC हा उपक्रम राबवला जातोय, कायाकल्प व NQAS मधील सर्व बाबींचा समावेश करून स्मार्ट PHC उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या कायाकल्प उपक्रमांतर्गत उत्कृष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ४० पैकी १८ स्मार्ट PHC चा समावेश हा झाला होता, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक व आरोग्य सुविधा वाढवण्यात याव्या व सर्व आरोग्य केंद्रांचा कायाकल्प करण्यात यावा असे आवाहन यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. दीपक लोणे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.