नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यात धारदार लोखंडी कोयता मिळून आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण राजेंद्र कोळी (२३ रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार ) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. कोळी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याच्यावर शहर पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी त्यास हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.९) तो एमआयडीसी पोलीसांच्या जाळयात अडकला.
घरकुल योजना येथील मनपा शाळा भागात तो येणार असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा लावला होता. संशयिेताच्या अंगझडतीत धारदार लोखंडी कोयता मिळून आला असून याबाबत पोलीस शिपाई अनिल कुºहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.