मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने थेट घातपाताचा संशय घेतला आहे. पटोले यांच्या कारला मंगळवारी रात्री भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ ट्रकची पाठीमागून धडक बसली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण, हा घातपातचा प्रकार नाही ना असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
या अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून पटोले थोडक्यात बचावले आहेत. या अपघातावरून काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोंढे म्हणाले, की विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत होते. त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकची जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे ;मात्र सुदैवाने या अपघातामध्ये पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
दुसरीकडे पटोले यांनी माझ्या गाडीचा हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, याची पोलिस चौकशी करतील, असे म्हटले आहे.