नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळया भागात राहणा-या चार महिलांच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी पंचवटी,आडगाव,इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना टकलेनगर भागात घडली. प्रतिभा सुदर्शन सराफ (रा.गोदावरी चेंबर्स टकलेनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सराफ या मंगळवारी परिसरातील क्लासिक आर्ट दुकानासमोरून आपल्या घराकडे पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दुसरी घटना इंदिरानगर भागात घडली. अरूणा दिलीप लोहार (रा.तुळजा भवानी नगर,वडाळा पाथर्डी रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोहार व अन्य एक महिला सोमवारी इंदिरानगर येथील श्रीसाई प्राईड बिल्डींग समोरून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी दोघीच्या गळ््यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीच्या दोन सोनसाखळया ओरबाडून नेल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
तिसरी घटना कोणार्क नगर भागात घडली. सुनंदा नामदेव उदावंत (रा. दत्तमंदिरासमोर कोणार्क नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उदावंत या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दत्त मंदिर परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ४२ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.
तर चौथी घटना जयभवानीरोड भागात घडली. याबाबत रामसुब्रमन्यम के अय्यर (रा.जाचकमळा,जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. अय्यर दांम्पत्य सोमवारी रात्री परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी अय्यर यांच्या पत्नीच्या गळयातील सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र व सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.