इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत केलेल्या भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या वक्तव्यामुळे मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून मुनगंटीवार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या याच पोस्टला उत्तर देत निवडणूक आयोगाने ‘आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे’ असे म्हटले आहे. सावंत यांनी मुनगंटीवार यांच्या भाषणाची एक क्लिप ट्विटरवर पोस्ट केली. निवडणूक आयोगाने मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.
सावंत यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. एका भावाला बहिणीबरोबर सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. @ECISVEEP ने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. @CEO_Maharashtra या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल.