इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’ पुस्तक चांगलेच चर्चेत आहे. या पुस्तकात येरवडा तुरुंगाच्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दबाव आणल्याचा उल्लेख आहे. बोरवणकरांच्या त्या आरोपाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाने चांगलीच हवा निर्माण केली आहे. कधीकाळी स्वत:च्या दंबग वृत्तीमुळे पोलिस प्रशासनात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण मीरा बोरवणकर यांच्या या पुस्तकानेसुद्धा खळबळ निर्माण केली आहे. विविध प्रकरणांचा समावेश असलेल्या या पुस्तकातील अजित पवारांशी संबंधित प्रकरणावर आता स्वत: त्यांनीच उत्तर दिले आहे.
बोरवणकरांच्या या आरोपांवर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. तीन-चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, पण माझा त्याचाशी काहीही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. अजित पवारांचे थेट नाव न घेता, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ‘दादा’ असा उल्लेख पुस्तकात केला आहे. या आरोपांवर आज अखेर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माझा काहीही संबंध नाही
पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी बोरवणकर यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी २००८ साली शासनाने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे. रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलतो.
तो त्यांचा अधिकार
मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरंच काही आहे, पण माझ्यावर फोकस केला जातोय. या प्रकरणानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी माझी चौकशी करा अशी मागणी केली, तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले आहे.