मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे… आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी असल्याचे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मनसेची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, “राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल. आज जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का? २०२४ ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही.
अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे. हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी. तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो.
एक गोष्ट स्पष्टच सांगतो… एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो… आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.…
मी अमित शहांना भेटल्यानंतर… २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, २०१९ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.
म्हणे ठाकरे कधी दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासाचं माहित नसतो… स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं… ह्यात वावगं काय ?
माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा… ‘रेल्वे इंजिन’ हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार… ! कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका. तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका… मी जे अपत्य जन्माला घातलं आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार… मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत.
जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल.
माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या… तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.
आज उद्धव ठाकरे , संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे, संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात…