४३ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या…पाथर्डी परिसरातील घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा परिसरातील दामोधर नगर भागात राहणा-या ४३ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भट गंगाधर पाटील (रा.साई सहवास रो हाऊस,दुर्गामाता मंदिरा शेजारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भट पाटील यांनी सोमवारी (दि.८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिवदास पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
जुगार खेळणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर येथील तेलंगवाडी भागात उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत श्रीराम वाघ (रा.दिंडोरीनाका),दत्तू निवृत्ती साळवे (रा.कालिकानगर,फुलेनगर) व रामदास सिताराम ठाकरे (रा.नवनाथनगर,पेठरोड) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. संशयित सोमवारी (दि.८) रात्री तेलंगवाडी भागात उघड्यावर मेन नाईट श्रीदेवी नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार ९०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस नाईक जयवंत लोणारे यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास हवालदार गुंबाडे करीत आहेत.