नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागातील सानेगुरूजी नगर येथील पेंढारकर कॉलनीत टोळक्याने धुडघूस घालत एका ज्युस विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्यात फायटरसह धारदारशस्त्राचा वापर करण्यात आल्याने २२ वर्षीय तरूण जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल चाफळकर,अभिनव कु-हे, सागर सुर्यवंशी व त्यांचे आठ ते दहा साथीदार अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. याबाबत नितीन दिलीप काकडे (२२ रा.महाजन हॉस्पिटल मागे,पेंढारकर कॉलनी सानेगुरूजी नगर) या व्यावसायीकाने याबाबत फिर्याद दिली आहे. काकडे रविवारी (दि.७) रात्री आपल्या राहत्या ठिकाणी व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
संशयित टोळक्याने परिसरात धुडघुस घालत काकडे यांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून त्यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ,दमदाटी व मारहाण करीत टोळक्याने त्यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायटर व धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत काकडे जखमी झाले असून संतप्त टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करीत मोठे नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.








