नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औैद्योगीक वसाहतीतील डीजीपीनगर भागात रॉग साईडने भरधाव येणा-या कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव सांगळे असे मृताचे नाव असून या अपघातात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारे बाळासाहेब धोंडीराम कुंभार्डे (५६) हे जखमी झाले आहेत. याबाबत संकेत सुनिल सांगळे (२३) रा. रमारमन अपा.मुरारी नगर,डीजीपीनगर या युवकाने फिर्याद दिली आहे. सांगळे व कुंभार्डे रविवारी (दि.७) सकाळच्या सुमारास डीजीपी नगर भागातून आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. केवलपार्क रोडने ते प्रवास करीत असतांना श्रीसाई अव्हेन्यू या इमारत भागात समोरून रॉंगसाईडने आलेल्या भरधाव इको कारने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात सांगळे यांचा मृत्यू झाला तर कुंभार्डे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.