पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –आयुष्यभर कमावलेली संपत्ती गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारणीसाठी खर्च करावी आणि या रुग्णालयाला जैन मुनी कुंदनऋषीजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही दिवंगत वडिलांची इच्छा होती. वडिलांचे हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय एका मुलाने घेतला आहे. यानुसार पुण्यात गरिबांसाठी स्वखर्चातून अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे मुलाने आणि नातवाने ठरविले आहे. या संभाव्य रुग्णालयासाठी मोफत दीड एकर जमीन आणि २५ कोटी रुपयांची तजवीज केली आहे.या नियोजित रुग्णालयाला जैन मुनी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे.
पुणे शहरातील कात्रज परिसरात येत असलेल्या गुजर निंबाळकरवाडी या गावाच्या हद्दीत हे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. यासाठी मोहनलाल गादिया वैद्यकीय संशोधन विश्वस्त संस्थेची (मेडिकल रिसर्च ट्रस्ट) स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून हे नियोजित रुग्णालये उभारले जाणार आहे. यानुसार तीन महिन्यात हे काम सुरु करून, तीन वर्षात हे रुग्णालय सुरु कऱण्याचा संजय गादिया यांचा संकल्प आहे.
पुण्यातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल गादिया यांचे हे स्वप्न होते. ते जैन मुनी कुंदनऋषी महाराज यांचे शिष्य होते. त्यामुळे गरिबांची सेवेसाठी गुरूंच्या नावे समाजसेवी प्रकल्प उभारायचा आणि या प्रकल्पासाठी अन्य कोणाकडून देणगी किंवा वर्गणी न मागता स्वतःच्या संपत्तीतून या प्रकल्पाची उभारणी व्हावी, असे मोहनलाल गादिया यांचे स्वप्न होते. त्यांचे (वडिलांचे) हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा संजय गादिया व नातू परेश गादिया यांनी पुढाकार घेतला आहे. एक लाख चौरस फुटांचे हे रुग्णालय असणार आहे.
वडिलांची इच्छा पूर्ण करणार
वडील मोहनलाल गादिया यांना आजारपणामुळे मृत्युपूर्वी काही महिने आधी खूप वेदना सहन कराव्या लागल्या. या वेदनांमुळे त्यांनी समाजाला उपयोगी ठरेल, असे अत्याधुनिक रुग्णालय स्वखर्चाने उभारण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. यासाठी वडिलांच्याच नावाने त्यांच्या हयातीतच मोहनलाल गादिया मेडिकल रिसर्च ट्रस्ट स्थापन केला आहे.
संजय गादिया,मुलगा