नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूकीत मी प्रचार करणार नाही, चहा पाजणार नाही, बॅनर लावणार नाही, अशी भाषा करणाऱ्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने घाम फोडले आहे. भाजपने फुगवलेल्या आभासी विकासाचा फुगा जनतेसमोर फुटला आहे. नागरिकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना नागरिकांकडून बेरोजगारी, महागाईवर प्रश्न विचारण्यात येत आहे. याचे उत्तर नसल्याने भाजप नेत्यांना नागपुरात प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्र्यांची गरज पडत आहे. त्यावरुन नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दलची भाजपच्या मनातील भिती दिसून असल्याचा घणाघात इंडीया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी लागावला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पुढे ठाकरे म्हणाले, “पिण्याचे स्वच्छ पाणी, अद्यावत आरोग्य केंद्र, दर्जेदार शिक्षण आदी मुलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरला आहे. ही लोकसभेची निवडणूक मी लढवत नसून नागपूरची जनता लढत आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गल्लोगल्ली नागरिक उत्स्फूर्तपणे भेटून आपला पाठिंबा दर्शवत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना शहरात प्रचारासाठी फिरणेही नागरिकांनी कठीन करुन सोडले आहे. म्हणूनच देशात विकासाचा डंका पिटणाऱ्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी नागपुरात बोलवावे लागत आहे.”
तरुणाचा फोन अन् ठाकरे रात्री दोन वाजता पोहोचले मानकापूर चौकात
मानकापूर चौकात रविवारी रात्री घडलेल्या भिषण अपघातात तब्बल १०-१२ चार चाकी वाहनांचे अपघात अनियंत्रीत ट्रकमुळे झाले. घटना घडताच जन आशीर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांना भेटणाऱ्या नागरिकाने विकास ठाकरे यांना फोन केला. तसेच अपघाताबद्दल सांगितले. यावेळी ठाकरे सकाळी ६ वाजता पासून नागरिकांना भेटून रात्रीची सभा आटोपून बैठकीत असतानाच परत रात्री दोन वाजता मानकापूर चौकात पोहोचले. तसेच नागरिकांची विचारपूस केली. तसेच पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत योग्य कारवाईची सूचना केली. आपण नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध आहे, असे विकास ठाकरे आपल्या जन आशीर्वाद यात्रेत सांगत असतात. मात्र खरंच ते उपलब्ध असतात याचा अनुभव आम्हाला आला असल्याचे मानकापूर येथील नागरिकांनी सांगितले.