मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 2 आणि पुणे विभागातील 7 व औेरंगाबाद विभागातील 2 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये 12 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून 19 एपिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्र छाननी दि 20 एप्रिल रोजी होईल तर 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.