नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नितीन गडकरी यांनी नागपूरसह संपूर्ण देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत भारताची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. आज देशाने गेल्या दहा वर्षांमध्ये जी प्रगती केली आहे, त्यात नितीन गडकरी यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केले.
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार-केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ फ्रेंड्स कॉलनी येथील शिवाजी चौकात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर माया इवनाते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर संदीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘देशाला ऊर्जा देणाऱ्या भूमिमध्ये आज संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. याच शहरातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे राष्ट्रीय राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशात त्यांनी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. आज नागपूरचे इन्फ्रास्ट्रक्चर बघून तर मी प्रभावित झालो. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नसतो. आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासकामांसाठी जेव्हा जेव्हा निधी मागितला तेव्हा तेव्हा त्यांनी होकार दिला आणि त्याची प्रचिती तुम्हाला उत्तर प्रदेशचे बदललेले चित्र बघून येईल.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची किमया गडकरींनी साधली. त्यामुळेच आज त्यांच्याबद्दल कुणीही नकारात्मक बोलत नाही. अश्या नेत्याला पुन्हा एकदा निवडून देण्याची संधी नागपूरकरांना मिळत आहे.’ ‘अब की बार चारसौ पार’साठी गडकरींना पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. ‘मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या भूमीतून आलोय. आमच्याकडे होळीच्या उत्सवात अनेक वर्षे ‘होली खेले रघुविरा’ हे गाणे वाजवले जायचे. पण आज पाचशे वर्षांनी रामलला खऱ्या अर्थाने होळी खेळले. काँग्रेस सत्तेत असती तर हे शक्य झाले नसते,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
जनतेचा उत्साह विजयाची खात्री देणारा – गडकरी
मी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. अश्या या कार्यकर्त्याला राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे भाग्य देखील लाभले. गेल्या दहा वर्षांत केंद्रीय मंत्री म्हणून नागपूरकरांची जी सेवा केली, त्याचे चांगले परिणाम आज बघायला मिळत आहेत. लोकसंवाद यात्रेत नागपुरात लोकांचा उत्साह आणि त्यांचे समर्थन मला निवडणुकीतील विजयाची पूर्ण खात्री देत आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ‘आपण दहा वर्षे मला आशीर्वाद दिलेत. तुमच्या आशीर्वादामुळेच मी देशात केंद्रीय मंत्री होऊ शकलो. आज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही गेलात तरीही चांगले रस्ते मिळतील. हे कार्य करण्याचे सौभाग्य मला लाभले,’ अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘नागपूर हे झिरो माईलचे शहर आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता या शहरात आहे. लवकरच नागपूर हे एव्हिएशन हब म्हणून नावारुपास येईल. येथून काही तासांच्या अंतरावर साडेतीनशे वाघ आहेत. त्यामुळे टायगर कॅपिटल म्हणूनही नागपूरची ओळख आहे,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण झाले. मुख्यमंत्री योगीजींनी रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आता संपूर्ण जगात आदर्श शहर म्हणून अयोध्येचा लौकिक होईल, असेही ते म्हणाले.