येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दरवर्षी दस-या पूर्वी येणा-या पहिल्या मंगळवारी बाजाराच्या दिवशी घोड्यांचा मोठा बाजार भरतो या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातील अश्वांची खरेदी विक्री होत असते.
येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबा यांच्या काळापासून सुमारे साडेतीनशे वर्षा पासून येवला शहरात घोड्यांचा बाजार सुरु झाला. रघुजी बाबा यांच्याकडे मोठ घोडदोळ असल्याने अनेक ठिकाणचे घोडे व्यापारी या ठिकाणी परप्रांतातून अश्व खरेदी-विक्री साठी येत असे. तीच परंपरा आज ही येथे सुरु आहे. दर मंगळवारी येथे घोड्यांचा बाजार भरत असला तरी नवरात्रोत्सवात दस-याच्या अगोदर येणा-या पहिल्या मंगळवारी येथे देश भरातून अश्व व्यापारी, अश्व प्रेमी यांची येथे गर्दी होत असते.
मारवाड, सिंधी, पंजाब, काठियावाड, तमिळनाडू, गुजराथ, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच माथेरान या सह देशी अश्व व तट्टू यांची रेलचेल येथे होत असते १० हजारा पासून ते लाखो रुपयांच्या पुढे या अश्वांची किमतीची बोली येथे लागत असते आणि अश्व प्रेमी पसंत पडलेल्या अश्वाला तेवढी किंमत देऊन त्याची खरेदी करीत असतो.