इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने एन्काऊंटर फेम मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा दिला आहे. शर्मा यांना उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नाही, असा आदेश दिला आहे.
उच्च न्यायालयाने शर्मा यांना तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
शर्मा यांनी २००६ मध्ये गुंड छोटा राजनचा कथित निकटवर्तीय रामनारायण गुप्ता याचा बनावट चकमकीत खात्मा केला. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सुभाष जाधव यांनी शर्मा यांच्या वतीने बाजू मांडली. शर्मा हे गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांचे रिव्हॉल्व्हर वापरले गेले, असा दावा त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने शर्मा यांच्यासह १३ जणांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. पुराव्याअभावी शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्याचा सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने रद्द केला होता.