नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील त्रिमूर्ती चौकात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका गटाकडून दुस-या गटावर गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून सहा जणांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.
या गोळीबार प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वैभव गजानन शिर्के (वय २३, रा. कामटवाडा, गोपाळकृष्ण चौक, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले, की रात्री १० वाजेच्या सुमारास जुना अंबड लिंक रोड, पवननगर, सिडको येथे आरोपी दर्शन दोंदे, गणेश खांदवे, राकेश गरुड, अक्षय गावजे, खग्या ऊर्फ अथर्व राजधीरे, बंटया ऊर्फ अजय राऊत व त्यांचे तीन ते चार साथीदार यांनी संगनमत करून वैभव शिर्के याच्याबरोबर झालेल्या वादातून कुरापती काढली. त्यावरून या दोघांमध्ये रात्री वाद झाले. त्यानंतर गोळीबार करण्यात आला.
अशी घडली घटना
रस्त्याकडून समोरील बाजूने मोटारसायकलीवरून दर्शन दोंदे, गणेश खांदवे, राकेश गरुड, अक्षय गार्वजे, खम्या ऊर्फ अथर्व राजधीरे, बंटी ऊर्फ अजय राऊत व त्यांच्यासोबत असलेले इतर तीन चार अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी त्यापैकी अजय राऊत याने फिर्यादी शिर्के याच्यावर कोयता उगारून तुझा फडशाच पाडतो, असे म्हणत धाव घेतली. त्यावेळी फिर्यादी शिर्के व त्याचा मित्र गाडीवरून खाली पडले. त्याच वेळी राकेश दोंदे याने त्याच्या कमरेला असलेले पिस्तुल बाहेर काढून शिर्केवर गोळी झाडली, तसेच आरोपी गणेश खांदवे यानेदेखील त्याच्याकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीच्या दिशेने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या तेथेच जमिनीवर पडल्या. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर करीत आहेत.