इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथील प्रचार सभेत काँग्रेसच्या घोषणापत्राची तुलना मुस्लिम लीग बरोबर केली होती. त्याविरुध्द काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या जाहीरनाम्याला वचने खोटी असल्याचेही म्हटले होते. त्यावरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
मोदी यांची ६ एप्रिलला राजस्थानमधील अजनेर येथे सभा झाली होती. त्यात त्यांनी घोषणापत्राला झूठ का पुलिंदा असे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसने आपला संतापही व्यक्त केला. काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे की, तुमचे कोणत्याही पक्षाशी मतभेद असू शकतात, पण राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत असे म्हणणे खेदजनक आहे. आपल्या धर्मनिरपेक्ष समाजाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्या पक्षांचा हा जाहीरनामा असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांना असे बोलण्याचा अधिकार नाही. ही बाब आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवली असून, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी विशेष विनंती त्यांना केली आहे.
काँग्रेसचा आरोप
काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी मोदी-शहांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य चळवळीत भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला. १९४२ मध्ये भारत छोडो दरम्यान महात्मा गांधींच्या आवाहनाला आणि मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोदी-शहा यांच्या पूर्वजांनी विरोध केला होता. तुमच्या पूर्वजांनी १९४० च्या दशकात बंगाल, सिंध आणि NWFP मध्ये मुस्लीम लीगसोबत आपली सरकारे स्थापन केली हे सर्वांना माहीत आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नरला पत्र लिहून १९४२ चे देश आणि काँग्रेसचे भारत छोडो आंदोलन कसे दडपले जावे हे लिहिले नव्हते का? असेही त्यांनी म्हटले आहे.