नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्रवीर सावरकर या सर्वत्र गाजलेल्या चित्रपटाचे निर्माता तसेच अभिनेता रणदीप हुड्डा यांनी रविवारी नाशिक येथील सावरकरांचे जन्मठिकाण असलेल्या भगुर गावी भेट दिली. भगुरकरांचा आणि रणदीप हुड्डा यांचा मेळ घडवून आणला नाशिक येथे स्थित युनायटेड वुई स्टँड फाउंडेशन चें संस्थापक अध्यक्ष सागर मटाले यांनी.
भगुर येथे रणदीप हुड्डा यांचे नियोजन केले होते. ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडत भगुर वासियांनी अभिनेता हुड्डा यांचं स्वागत केलं.
पुढे सावरकर वाडा येथे युवतींनी त्यांचे औक्षण करत वाड्याला भेट देण्यासाठी आभार मानले व पुन्हा नाशिक ला सावरकर जयंती निमित्त येण्याचं आमंत्रण देखील दिले. जनतेच प्रेम आणि उत्साह पाहून त्यांनीं सर्वांचे आभार मानत, छत्रपती शिवाजी चौक भगुर येथे सावरकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्मारकाची पाहणी करत इतिहासातील सावरकरानविषयी लहानसहान गोष्टी समजावून घेताना सावरकरांना स्वातंत्र्यलढ्या दरम्यान किती यातना सहन कराव्या लागल्या हे जाणवताच त्यांचे डोळे पाणावले. तेथून पुढे भगुरवासियांचा निरोप घेतला. त्यांच्या नाशिक भेटी प्रसंगी देवळाली नाशिकचे लेफ्टनंट जनरल हरिमोहन अय्यर यांनी देवळाली कॅम्प येथे त्यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले व लष्करातल्या बऱ्याच गोष्टी समजून घेऊन लष्करी प्रशिक्षण केंद्राची देखील पाहणी केली.
अभिनेता रणदीप हड्डा यांनी पुढे कॉलेज रोड येथील मूव्ही मॅक्स तसेच त्रिमूर्ती चौक येथील दिव्या ॲडलाब या मूव्ही थिएटरला भेट दिली , तेथे त्यांचं औक्षण करून त्यांना फेटा बांधण्यात आला, चित्रपट संपताच त्यांनीं जनतेशी थेट संवाद साधला, व लहान मुलांनी आणि युवकांनी सावरकरांना प्रेरणास्थान मानून आपण भविष्यात देशासाठी काहीतरी करून भारताचे नावं उंचवावे असे सांगितले, या पुढे देखील आपण असच महान योध्यांवर चित्रपट बनवू आपणा सर्वांच्या भेटीला येऊ अशी ग्वाही दिली.
संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले यांनी त्यांचा सत्कार करत एक फ्रेम दिली. सावरकरांचा जीवनप्रवास आपणा सर्वांसमोर आणल्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्यांचे व त्यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. या प्रसंगी युनाइटेड व्ही स्टॅंडचे कमिटी सदस्य अंकुश चव्हाण, कुशल लुथरा, पियुष करणावट, नीरज चांडक, गिरीश गलांडे, हिमांशु सूर्यवंशी, ओम काठे, हरीश सिंग, बंसरी पटेल, तेजल काळे, स्मिता वाघ, अश्विनी कांबळे, अनिकेत गिते, रवींद्र चव्हाणके आदी लोकांनी नियोजन केले.