मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खिचडी घोटाळ्यातील सूत्रधार संजय राऊत असून त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली मिळाल्याचा सणसणाटी आरोप संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी निरुपम म्हणाले की, संजय राऊत यांच्या भावाच्या व मुलीच्या नावाने चेकव्दारे रक्कम घेतली आहे. यावेळी त्यांनी खिचडी प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या तपासात अमोल किर्तिकरसह संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ते म्हणाले की, आज शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईतील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. चौकशीनंतर ईडी काय करते, ते मला माहीत नाही. पण त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील संपूर्ण जनतेला कळायला हवे की, त्यांचा संभाव्य उमेदवार किती अप्रामाणिक आहे.
या घोटाळ्यावर मी काम सुरू केले तेव्हा मला कळले की ‘किंगपिन’ कोणीतरी आहे. या संपूर्ण घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणजे शिवसेनेचे (UBT) प्रवक्ते संजय राऊत आहे. या घोटाळ्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावावर पैसे घेतले आहेत. त्यांनी चेकद्वारे लाच घेतली आहे.