इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोलाः गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अकोला येथे कारागृह निरीक्षकाला कुख्यात गुंड गजानन कांबळेला भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारागृह प्रवेशद्वारासमोर गाडी लावल्यावरून हा वाद झाल्यानंतर गुंडानी थेट धमकी दिली आहे. त्यात या गुंडानी अधिकाऱ्याची कॉलर पकडून बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर बाळसिंग पाटील हे अकोला जिल्हा कारागृहाचे निरीक्षक आहेत. कारागृहात ‘एमपीडीए‘ प्रकरणी कैद असलेल्या गजानन कांबळेला भेटण्यासाठी काही जण आले होते. सराईत गुन्हेगार असलेला स्वप्नील उर्फ लाल्या पालकर हा त्यात आला होता. त्यातील एकाने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समोर दुचाकी लावल्यामुळे अधिकाऱ्यांनी पालकरला दुचाकी कोणाची आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर या गुंडाचा संताप झाला व त्याने बंदुकीने उडवून जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. धक्काबुक्की करून कारागृह निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शर्टची कॉलर पकडली. शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला.
लाल्या पालकर हा जखमी झाला. तो त्याच अवस्थेत घटनास्थळावरून पसार झाला. कोतवाली पोलिसांच्या डीपी पथकाने त्याचा पाठलाग करून अटक केली.