इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः जातीयवादी लोकांच्या हातातील सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सत्तेतून दूर करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना ते म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे; परंतु मोदी यांचे ऐकले नाही, म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. लोकशाहीची हत्या सुरू आहे. सरकारची जबाबदारी सर्वसामान्य लोकांची काळजी घेणे ही आहे. महापुरुषांचे विचार पुढे न्यायचे काम आम्ही करत आहोत. मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक घेणार आहोत. मातंग समाजामध्ये कतृत्ववान माणसे आहेत. मातंग समाजाच्या सवलतीच्या मागणीबाबत सरकारने विचार करावा.
पवार म्हणाले, की चार वर्षांपूर्वी ओडिसामध्ये आदिवासी लोकांची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांवर हल्ले झाले. ही माहिती समजल्यानंतर आम्ही ओडिसामध्ये गेलो. हल्ले झालेल्यांना धीर दिला. ज्यांनी हल्ला केला, त्यांच्यावर खटले भरण्यास सांगितले. आज दुर्दैवाने अशी स्थिती मणिपूरमध्ये आहे. मणिपूरची स्थिती गंभीर झाली असून समाजाचे दोन भाग पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात जातात; पण मणिपूरमध्ये जात नाहीत. गुंड प्रवृतीने डोक वर काढल्यानंतर तिला ठेचायते असते. ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यांना धीर देण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यांची भूमिका न्यायपूर्ण नाही.