नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरी बसून पक्ष चालत नसून त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते. शिवसेनेसाठी १०० हून अधिक केसेस छातीवर घेतल्या म्हणून आज मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो असे यावेळी निक्षून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना पुन्हा एकदा रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार राजू पारवे, खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री दीपक सावंत, आमदार आशिष जयस्वाल, आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेवक मंगेश सातमकर, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षयमहाराज भोसले, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या लढाईचा पहिला टप्पा आपण यशस्वी केला असून आता मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना विजयी करावे. याच रामटेक मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीवेळी आपण स्वतः मेहनत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला होता.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे जागतिक पटलावर देशाचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. देशाचा सर्वांगीण विकास करून विकसित भारत बनवणे हा त्यांचा अजेंडा आहे. तर दुसरीकडे झेंडा आणि अजेंडा दोन्ही नसलेली लोकं त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आगामी निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच अब की बार चारसो पार हा नारा यशस्वी करून दाखवण्यासाठी मोठ्या जोमाने कामाला लागा असे आवाहन केले.