नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले समाधान कशात आहे व ते शोधण्यासाठी.सामाजिक मूल्यांचा.शोध घेणे ही आपली पहिली जबाबदारी आहे .त्यासाठी तत्वांशी प्रामाणिक राहणे हे पहिले कर्तव्य आहे. डॉक्टर स्वतःसाठी नसतोच. तो समाजासाठी असतो हे कायम मनात ठेवून रुग्णसेवा करीत राहा. तत्वांपर्यंत पोहोचणे हा जीवनातील सर्वात महत्वाचा प्रवास असतो असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. करीर बोलत होते. शालिमार येथील आयएमए हाऊसमधील डॉ. ह.स. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नूतन अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, मावळते अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, पुढील वर्षाचे नियोजित अध्यक्ष डॉ. निलेश निकम, नुतन कार्यकारीणीचे सचिव डॉ. रविराज खैरनार, उपस्थित होते.
डॉ. नितीन करीर म्हणाले, कोणती तत्व घेऊन जगायचे हे निश्चित झाले की काय करावे, काय करू नये हे ठरविता येते. यातूनच माणसाचा समाधानाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. समाजाने जे चांगले वाईट म्हटले त्याची चाचपणी विवेकाची चाळणी लावून करायला हवी. डॉक्टरांची फी परवडणारी नसेल तर गरजवंत तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपल्या ज्ञानाचा उपयोग सामान्य रुग्णांनाही व्हावा असा दृष्टीकोन असायला हवा असा विचार डॉ. करीर यांनी मांडला.
डॉ सुधीर संकलेचा यांनी आय एम ए नाशिक अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करतांना भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली . संस्था म्हणून आय एम ए नाशिकला अधिक सशक्त करताना, वाढलेल्या सदस्य संख्येसोबतच कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. डिजिटल डेटा एकत्रीकरण , प्रशिक्षण कार्यशाळा,डॉक्टर रुग्ण संवादासाठी उपक्रम, वैद्यकीय कायद्यांबाबत जागरूकता, आय एम ए चे डॉक्टरांना रुग्णालय चालवताना येणाऱ्या प्रशासकीय समस्या सोडवणे, तसेच सदस्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपक्रम राबविण्यावर भर देणार असे त्यांनी नमूद केलेआयएमएचे विशेष अॅप विकसित करण्यात येत असून महिनाभरात ते कार्यान्वित होईल.
मावळते अध्यक्ष डॉ विशाल गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वर्षभरात आय एम ए नाशिक मार्फत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 100 पेक्षा जास्त आजीवन सदस्यांची या वर्षभरात वाढ नोंदवली गेली. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सचिव माननीय डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी विराजमान झालेले पहिले वैद्यकीय पदवी मिळवलेले मुख्य सचिव आहेत .डॉ. करीर यांची या कार्यक्रमास उपस्थित ही आय.एम.ए. नाशिकसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
डॉ नितीन करीर यांचा परिचय डॉ चंद्रकांत संकलेचा यांनी करून दिला. नूतन सचिव डॉ रविराज खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले.
डॉ नीरजा कणीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यकारिणीत यांचा समावेश
कार्यकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र नेहते आणि खजिनदार म्हणून ललेश नाहाटा यांनी पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्यांमध्ये डॉ. श्रीया कुलकर्णी, डॉ. शिल्पा दयानंद, डॉ. स्मिता मालपुरे, डॉ. निकिता पाटील, डॉ. शलाका बागुल डॉ. श्याम चौधरी, डॉ. निलेश जेजुरकर, डॉ. सागर भालेराव, डॉ. किरण शिंदे, डॉ. किशोर वाणी, डॉ. कपिल पाळेकर, डॉ. मिलींद भराडीया, डॉ. पंकज भट, डॉ. अनुप भारती आणि डॉ. सागर डुकले यांचा समावेश आहे.