योगेश कातकाडे, कर सल्लागार
आर्थिक वर्ष २०२३-२४ नुकतेच संपलेले असून मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठीचे आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी करदात्यांमध्ये लगबग सुरू असून कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी विकसित होत असून माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विविध क्षेत्रात बदल केले जाऊन आधुनिक सेवा सुविधा दिल्या जातात. आयकर विभागा कडून देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांसाठी अधिक तत्पर सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी प्रथमच आयकर विभाग, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने रिटनची प्रक्रिया वेळेत व सुलभ करण्यासाठी आयटीआर फॉर्म लवकर अधिसूचित केले आहेत. त्यामुळे करदात्यांना १ एप्रिल २०२४ पासूनच आर्थिक वर्ष २०२३-२४ (मूल्यांकन वर्ष २०२४-२५) साठीचे आयकर विवरणपत्र (आय टी रिटर्न) भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.
आता पर्यंतच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, आयकर विभागाने करदात्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे विवरणपत्र भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी आयकर रिटर्न भरण्याची घाई करू नये असे तज्ञ कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी सांगितले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, वार्षिक माहिती प्रणाली (AIS) आणि 26 AS संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२४ ला लगेचच अपडेट होत नसते. यामुळे रिटर्न मधील विसंगती टाळण्याकरिता किंवा रिटर्न फायनल करण्यापूर्वी AIS व फॉर्म 26 AS अद्यावत उपलब्ध होईल तोपर्यंत प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.
AIS आणि फॉर्म 26AS म्हणजे काय ?
करदात्यांना त्यांच्या व्यवहारांची ऐच्छिक परिपूर्तता करण्यासाठी व कर चोरीला लगाम लावण्यासाठी आयकर विभाग विविध उपाय योजना करत आहेत याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाच्या ई-पोर्टलवर AIS/26AS द्वारे तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
विविध स्रोतांच्या/डेटाच्या माध्यमातून आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहार बद्दलची माहिती प्राप्त असते. TDS/TCS आकर्षित करणाऱ्या पावत्या, स्थावर मालमत्ता खरेदी किंवा विक्री, बँक ठेवी, शेअर्स/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, मुदत ठेवी तसेच इतर स्रोतच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न, इ. माहिती तुमच्या आयकर खात्याच्या AIS / 26AS पोर्टलवर उपलब्ध असते. त्यामुळे रिटर्न दाखल करतेवेळी तुम्ही तुमच्या उत्पन्नाची खात्रीपूर्वक सर्व माहिती देऊन कराचे योग्य पद्धतीने मूल्यमापन केले आहे हे पाहणे गरजेचे आहे.
योगेश भास्कर कातकाडे
कर सल्लागार
नाशिक
मो. 9881843617
ई – मेल : kkservices31@gmail.com