लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला विधानसभा क्षेत्राचे आमदार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून निफाड तालुक्यातील हनुमाननगर गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी घेतला जाणार नाही याबाबत १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत हनुमाननगरचे सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक न घेता ठरावाचे पत्र करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. आणि काही वर्तमानपत्रांमध्ये याबाबत बातम्या आल्या होत्या. मात्र आता या प्रकरणी हनुमान नगरच्या सरपंचानी दिलगिरी व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांना दिलगिरीचे पत्र दिले आहे.
सरपंचानी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत हनुमाननगरचे सरपंच यांनी सोशल मिडीयावर व काही न्युज चॅनलवर भुजबळ साहेबांचे विरोधात मराठा आरक्षणाचे विरोधाबाबत प्रकाशित केलेली बातमीमध्ये लिहिल्या प्रमाणे भुजबळ साहेबांचा कोणत्याही प्रकारचा निधी हनुमाननगर गावातील विकास कामांसाठी घेतला जाणार नाही हे वाक्य भावनेच्या भरात नजर चुकीने टाकले गेले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने हनुमाननगर गावात होणाऱ्या विकास कामांना कोणताही विरोध नाही.
त्याबाबत हनुमाननगर गावाचा कोणताही विरोध नाही याबाबत हनुमाननगर गावचे वतीने सरपंच या नात्याने सदर घडलेल्या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.