इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाचे (आप) नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे उपोषण केले. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांच्या सांगितले की, आम आदमी पक्षाचे आमदार, मंत्री, खासदार आणि नगरसेवक दिल्लीतील जंतरमंतर आणि पंजाबमधील हुतात्मा भगतसिंग यांचे गाव खटखरकलन येथे सामूहिक उपोषण केले.
या उपोषणाबाबत आम आदमी पक्षाने म्हटले की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कटाचा भाग म्हणून ‘ईडी’ने अटक केली आहे. तपास यंत्रणेच्या या भूमिकेनंतर संपूर्ण देश आज उपोषण करून हुकूमशहाला कडक संदेश देत आहे. आज केजरीवाल यांचे देशभरातील आणि जगभरातील समर्थक उपोषण करत आहेत.
उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूसह देशातील २५ राज्यांच्या राजधानी, जिल्हा आणि ब्लॉक मुख्यालये, गावे आणि शहरांमध्ये सामूहिक उपोषण करून लोक केजरीवाल यांना आशीर्वाद देत आहे. तर भारताशिवाय न्यूयॉर्क, बोस्टन, लॉस एंजेलिस, अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी, कॅनडातील टोरंटो, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, ब्रिटनमधील लंडन यासह परदेशातील अनेक शहरांमध्ये लोक सामूहिक उपोषण करत असल्याचे आपतर्फे सांगण्यात आले.