बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महायुती व महाविकास आघाडीत बहुतांश ठिकाणी सरळ सामना होईल असे वाटत असतांना काही ठिकाणी वंचित तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उतरणार असल्यामुळे या निवडणुकीचे निकाल वेगळेच दिसणार आहे. बीडमध्ये दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे.
मेटे यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. परंतु पवार यांनी बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्यामुळे मेटे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे बीडमधून अपक्ष लढण्याचा मेटे यांचा निर्धार आहे.
मेटे यांनी बीड जिल्ह्यात सुरू केलेल्या गाठीभेटींना चांगला प्रतिसाद मिळाला. त्या म्हणाल्या, की जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. माझ्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले आहे. लोकसभा कशी लढवायची, यासंबंधीचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार आहे.
बीडमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान असल्याने भरपूर वेळ आहे. बीड लोकसभा मतदार संघात भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. मेटे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला, तर या ठिकाणी तिरंगी लढत होऊन त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची भीती आहे. मेटे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. शर्यतीत जिंकण्यासाठीच उतरणार असल्याचा निर्धार त्यांनी केला.