नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल दीड हजार वादक, एक हजार ढोल आणि २५० ताशांचे महावादन महोत्सव नाशिकच्या गोदाकाठी पार पडला. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक शहरातील गोदाकाठावर महावादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 1000 कलाकारांनी सामूहिक ढोल ताशा वादन सादर केले.
राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव यावेळी झाला. या वर्षी हे महावादन क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना समर्पित करण्यात आले होते. एकूणच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समिती तर्फे फाल्गुन कृष्ण १२, शके १९४५ – शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पाडवा पटांगण येथे “महावादन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सन २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षी या महावादनाचं हे ८ वं वर्ष असून नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम , बंधुभाव आणि एकोपा ही भावना निर्माण व्हावी या उद्देशाने नाशिक शहरातील तसेच सिन्नर ग्रामीण मधील दिंडोरी, लासलगाव, सायखेडा, पालखेड अशा जिल्ह्यातील ३० हून अधिक ढोल पथकांशी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या महावादनात १००० ढोल, २५० ताशे आणि १५०० वादक आणि मराठी व पारंपरिक वाद्य संबळच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात १०० स्वयंसेवकांनी काम केले आहे. या महावादनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किसनराव जाधव (क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज), पुणे, कुसुमताई बाबासाहेब गोपले (राष्ट्रीय नेत्या अखिल भारतीय मातंग समाज, समाजसेविका), नाशिक, श्रीकांत साळवे (ताशा सम्राट), पुणे आणि पै.केतन अशोक साळवे. गंज पेठ पुणे (आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज), डॉ. विजयराव मालपाठक, राजेश दरगोडे हे उपस्थित होते. या सर्व तीस पथक प्रमुखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
ध्वजप्रणाम करत भारत माता की जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले. त्यानंतर अयोध्या रामजन्मभूमी श्री राम मंदिर स्थापना झाली असल्याने भीमरूपी तालासह पारंपरिक आवर्तनाने वादनात रंगत आणली, त्यासोबत ढोल ताशा ध्वजा सोबत बरची नृत्य सादरीकरण झाले. त्यानंतर सिंहगर्जना मधील महिला वादकांनी यांनी सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला.
या महावादन कार्यक्रमाचे प्रमुख प्रितम भामरे हे होते तर सूत्रसंचालन अक्षता देशपांडे, सिद्धी दामले यांनी केले. यावेळी नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यास चे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समिती चे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, जयंत गायधनी, जयेश क्षेमकल्याणी, स्वरूपा मालपुरे हे उपस्थित होते. पुढील सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन समितीमार्फत केले आहे.
कार्यक्रमात उद्या – महारांगोळी
फाल्गुन कृष्ण १३/१४, शके १९४५ – रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून महारांगोळी: तृणधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारे.