नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया अपघातामध्ये ३० वर्षीय महिलेसह ७४ वर्षीय पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला. वडनेर पाथर्डी रोड व नाशिकरोड परिसरात शुक्रवारी हे अपघात झाले. हायवा ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत महिलेचा तर अज्ञात अॅटोरिक्षाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अपघात नाशिक पुणे मार्गावर झाला. उत्तम सुरज आदोलकर (रा.सुंदरनगर राजवाडा,देवळाली गाव) हे वृध्द शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घंटा म्हसोबा महाराज मंदिरासमोरून पायी जात असतांना त्यांना भरधाव अज्ञात रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.सतिश कुमार मिना यांनी उपचार सुरू असतांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुस-या घटनेत गौसिया मुजहीद शहा (३०) या शुक्रवारी सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा ते वडनेर गेट या मार्गावरून आपल्या मोपेड दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ डीके ४९५८ या हायवा ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने गौसिया शहा यांचा मृत्यू झाला. याबाबत मुस्तफा शहा (रा.बालाजी अपा.पाथर्डी शिवार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालका विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.