इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय तटरक्षक दल आणि रामनाथपुरम येथील सीमाशुल्क विभागाच्या प्रतिबंधक युनिट (सीपीयु) यांच्या संयुक्त कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तामिळनाडूमधील मंडपमजवळ वेधलाई किनारपट्टी येथील मध्य समुद्रात 4.9 किलो विदेशी सोने जप्त केले.
मासेमारी बोटीचा वापर करून एका टोळीद्वारे रामनाथपुरम जिल्ह्यातील वेधलाई किनाऱ्यावरून श्रीलंकेतून विदेशी सोन्याची भारतात तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी ) अधिकाऱ्यांनी 3-4 एप्रिलच्या मध्यरात्री मंडपमजवळील वेधलाई किनारपट्टी भागात संशयित मासेमारी नौकांच्या हालचालींवर पाळत ठेवली. 4 एप्रिलच्या पहाटे, अधिकाऱ्यांनी मध्य समुद्रात एका संशयित बोटीचा तटरक्षक दलाच्या जहाजातून पाठलाग केला आणि ती बोट अडवली. त्यांना अडवण्याच्या आधीच संशयित बोटीवरील एका व्यक्तीने काही माल समुद्रात टाकला होता,असे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
या देशी बोटीवर तीन जण होते आणि चौकशीदरम्यान त्यांनी समुद्रात टाकलेल्या मालामध्ये श्रीलंकेतून तस्करी केलेल्या विदेशी सोन्याचा समावेश असल्याचे कबूल केले आणि ते श्रीलंकेच्या खोल समुद्रात एका बोटीतून त्यांना मिळाले होते.
दरम्यान, सीपीयू रामनाथपुरमचे अधिकारीही एका बोटीत बसले आणि ज्या ठिकाणी तस्करीचे सोने समुद्रात फेकले गेले ते ठिकाण शोधून तिथे शोध मोहीम सुरू करण्यात आली. 5 एप्रिल रोजी दुपारी, समुद्राच्या तळापर्यंतच्या व्यापक शोध मोहिमेनंतर तस्करीचे सोने परत मिळवण्यात आले. त्यात 3.43 कोटी रुपये किमतीच्या 4.9 किलो वजनाच्या वेगवेगळ्या आकाराच्या कच्च्या सोन्याच्या पट्ट्या एका टॉवेलमध्ये घट्ट बांधल्या होत्या आणि ते नजरेत येऊ नये म्हणून समुद्रात फेकल्या गेल्या होत्या. डीआरआय अधिकाऱ्यांनी 4.9 किलो विदेशी तस्करीचे सोने जप्त केले असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.