चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठयाची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकच्या पार्श्वभुमीवर जिल्हयाचे सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार या कारवाई केल्या जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई -आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजुकडे जाणारे एका ट्रक मधून मोठया प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात वाहन तपासणी सापळा रचुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत तसेच गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यातच विक्री करीता असलेला खालील वर्णनांचा व किंमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन एका टाटा ट्रकसह जप्त केला आहे.
या कारवाईत गोवा राज्य निर्मीत रॉयल ब्लु व्हिस्कीचे ४४८ बॉक्स ४३,००,८०० रुपये तर टाटा कंपनीचा ट्रक MH-15-HH-6361 व मोबईल फोन रुपये १८,०६,००० असा एकुण जप्त वाहन व साहित्य एकुण मुद्देमाल ६१,०६,८०० रूपये जप्त केला.
या कारवाईत पदमसिंग कैलास बजाड, वय ३५, रा. जळकु, ता. मालेगाव, जि. नाशिक, हल्ली रा. अश्विननगर, सिडको याला अटक करण्यात आली आहे. बजाड याने गोवा राज्यातुन मद्यसाठा ट्रकमध्ये भरून बिल न बनविता ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड टाईप पावडरचा माल असल्याचे भासवून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या ख-या असल्याचे भासवून अवैधरित्या विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने स्वतःचे कब्जातील ट्रकमध्ये वाहतुक करतांना मिळून आला. त्यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील सपोनि गणेश शिंदे व अंमलदार करीत आहे.
या कारवाईत सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, संदिप नागपुरे, मेघराज जाधव, प्रविण गांगुर्डे, पोना हेमंत गिलबिले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदिप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोड यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.