नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एकास तब्बल साडे तीन कोटी रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या रकमेसह परतावा न मिळाल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदन कुमार बेरा (रा. वेस्ट बंगाल), रघुवीर कुमार संधु (रा.विमाननगर,पुणे), मुकेश कुमार, क्रांतीकुमार व बप्पीदास मायापुरध्तारकेश्वर (रा. तिघे कोलकत्ता,पं.बंगाल), अरूप घोष व बोलोमन मिन्ट अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत राहूल शांताराम सावळे (रा.गितांजली कॉलनी,इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितानी जुलै २०२२ मध्ये सावळे यांची भेट घेतली होती. या भेटीत संशयितांनी बनावट कंपनीचे कागदपत्र दाखवून राईस पुलर बिझनेस व रेडिओ अॅक्टीव्ह (युरेनियम) या इन्व्होल्टा कंपनीच्या उत्पादनाची माहिती देत गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यात आले.
यावेळी गुंतवणुकीवर जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवित सावळे यांना विश्वासात घेण्यात आल्याने त्यांनी सुमारे ३ कोटी ४६ लाख रूपयाची गुंतवणुक केली. कालांतराने संशयितांचा संपर्क तुटल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शरमाळे करीत आहेत.