इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याण – डोबिंवली लोकसभा मतदार संघात विद्यमान शिवसेना खासदार डॅा. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात असे म्हणण बोचरी टीका केली आहे.
या पोस्टमध्ये अंधारे यांनी म्हटले आहे की, श्रीकांत शिंदे हे एकनाथभाऊंचे चिरंजीव म्हणून आस्था, आपुलकी आहे. पण त्यांची उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी, डुप्लिकेट पक्षप्रमुखांनी जाहीर करण्याच्या ऐवजी फडणवीसांनी जाहीर करावी यातून शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट होते.
गेल्या काही दिवसांपासून या जागेवर भाजपने दावा केला होता. त्यामुळे ही जागा भाजपला की शिंदे गटाला यावर चर्चा रंगली होती.भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत असतांना त्यांनी ही घोषणा केली.
आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाने दोन वेळेस उमेदवारांची घोषणा केली. पण, त्यांच्या उमेदवारांची घोषणा पहिल्यांदा भाजपने केली. या मतदार संघात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असल्यामुळे ही घोषणा फडणवीस यांनी केली. पण, त्याच गोष्टीवरुन ठाकरे गटाने आता या कृतीवर टीका केली आहे. या मतदार संघात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर व श्रीकांत शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे.