नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एमबीबीएसला मॅनेजमेंट कोट्यातून नंबर लावून देतो असे सांगून दोघांनी शहरातील एका महिलेस तब्बल साडे ३४ लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून नंबर लावून देण्याचे आमिष दाखवून हा गंडा घातला गेला. या महाविद्यालत नंबर तर लागला नाही. त्यामुळे महिलेने पैशांसाठी तगादा लावला असता संशयितांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वामन म्हात्रे (रा.रिजेन्सी इस्टेट,दावडीगाव डोंबिवली पुर्व ठाणे) व कल्पना रघुनाथ पाटील (रा.प्रतिक रेसि.ना.रोड) असे संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत विशाखा दिनकर वानखेडे (रा. कॉलेजरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वानखेडे यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेणार असल्याने त्यांनी २०२२ मध्ये दोघा भामट्यांनी भेट घेतली होती. नाशिक पुणे रोडवरील कामत हॉटेलमध्ये २५ सप्टेंबर रोजी ही भेट झाली होती.
यावेळी संशयितांनी कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला नंबर लावून देण्याची ग्वाही दिली होती. या कामाच्या मोबदल्यात संशयितांनी ३४ लाख ६१ हजाराची रोकड स्विकारली होती. शैक्षणीक वर्ष उलटूनही प्रवेश न मिळाल्याने वानखेडे यांनी विचारणा केली असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.