नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षीय चिमुरडीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास २० वर्ष सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकाश आबासाहेब ठोंबरे (४३ रा. पाथरवट लेन पंचवटी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना गेल्या वर्षी पाथरवट लेन भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.५ च्या न्या.श्रीमती पी.व्ही.घुले यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड. लिना चव्हाण यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये दोषी ठरवत त्यास २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा असे निकालपत्रात नमुद केले आहे.
घरात बोलावून केले कृत्य
ठोंबरे याने १० ते १४ जुलै दरम्यान अंगणात खेळणा-या सहा वर्षीय बालिकेस कशाचे तरी आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले होते. ही बाब निदर्शनास येताच पीडितेच्या आईने याबाबत पोलीसात धाव घेतल्याने याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक मिथुन परदेशी यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते.