नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्राच्या मदतीने मावस भावाचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात ग्रामिण पोलीसांनी दोन जणांना कसारा रेल्वेस्थानक भागात दोघांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. कृष्णा उर्फ पोपट जालींदर जाधव (२२ रा.चिंचोली गुरव ता.संगमनेर) व अजय सुभाष शिरसाठ (२३ रा.चास.ता.सिन्नर ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अनैतिक संबधाच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
बुधवारी सिन्नर तालुक्यातील कहांडवाडी येथे सकाळच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह मिळून आला होता. घटनास्थळावर रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने सदर युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत वावी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठलाही धागा दोरा नसतांना पोलीसांनी सदर तरूणाची ओळख पटविली. मृताचे नाव दिलीप भाऊसाहेब सोनवणे (रा.चिंचोली गुरव ता.संगमनेर) असे नाव निष्पन झाल्याने पोलीसांनी सोनवणे याच्याबाबत माहिती काढत तो कोणा समवेत राहत होता याबाबत माहिती मिळविली.
मयत दिलीप सोनवणे हा मावसभाऊ कृष्णा जाधव याच्या समवेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी जाधव याच्याकडे आपला मोर्चा वळविला मात्र घटनेपासून तो पसार होता. त्याचा मोबाईलही बंद असल्याने या खूनाचा उलगडा करण्याचे पोलीसांसमोर मोठे आवाहन ठाकले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघे संशयित पोलीसांच्या हाती लागले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कृष्णा उर्फ पोपट जाधव व त्याचा मित्र अजय शिरसाठ हे दोघे कसारा रेल्वेस्थानक भागात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.५) एलसीबी आणि इगतपुरी पोलीसांनी रेल्वेस्थानक भागात सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकले.
पोलीस चौकशीत त्यांनी अनैतिक संबधाच्या संशयातून दिलीप सोनवणे याची हत्या केल्याची कबुली दिली असून त्यांना वावी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे,अंमलदार नवनाथ सानप,विनोद टिळे,विश्वनाथ काकड,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,विकी म्हसदे तसेच इगतपुरीचे जमादार गणेश परदेशी,अंमलदार अभिजीत पोटींदे आदींच्या पथकाने केली.